Sunday, 27 August 2017

३ एप्रिल : एका अस्मितेचा अंत

३ एप्रिल हा छत्रपतींचा निर्वाण दिन ! त्या पुण्यश्लोक छत्रपतींचे हे पुण्यस्मरण ! काय वाटत असेल आज त्यांना ? ही कल्पना मांडणारा हा लेख .....
उदय गंगाधर सप्रेमअर्पण.....

आज ३ एप्रिल २००९ ! या इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे / तारखेप्रमाणे आजपासून ३२९ वर्षांपूर्वी.....
शिवरायांचे स्वगत :
आज हनुमान जयंती - चैत्र शुध्द पौर्णिमा !
महाराज साहेब , आऊसाहेब , सई , काशिबाई.....आज आम्ही तुमच्या भेटीस निघालो.मगाशीच सर्वांशी निरवानिरव करुन झाली.सोयराबाई राणीसाहेब यांनी अशक्तम दुर्बलम अशा राजारामाच्या गुढग्याला छत्रपतीपदाचं बाशिंग बांधून ठेवलंय! आमचे सारे निरोप व खलिते - शंभूबाळांसाठी धाडलेले - रायगड उतरलेच नाहीत ! बाळाजींनी मघा नजर चुकवली , खलिते "पाठवले" म्हणाले ! अरे , दिलेरखानांस मिळून झाल्यानंतर , स्वराज्याचा खातमा होईल - आबासाहेबांच्या मनिषेच्या नरड्यालाच नख लागेल हे उशिराने लक्षात येतांच आपली चूक पदरांत घेण्याच्या विनंतीसह "आम्हांस साहेबी पायांची जोड आहे , आम्ही दूधभात खाऊन साहेबांच्या पायांचे चिंतन करून राहीन !" असे निष्कपटपणे आणि नि:स्वार्थीपणे सांगणारे शंभूराजे "आम्ही अत्यवस्थ आहोत !" असं कळल्यावरही पन्हाळा सोडून आम्हांकडे येणार नाहीत - या गोष्टीवर - एका वेळी तीन तीन बलाढ्य अश्या पादशाह्यांशी झुंजणारे छत्रपती विश्वास ठेवतील असे वाटणार्‍या सोयराबाईंच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते !
पुतळाबाई राणीसाहेबांस बोलावणे पाठवले तर "त्या स्वतःच आजारी आहेत" असं महाराणी सोयराबाई म्हणाल्या ! मूर्तीमंत वात्सल्याचा पुतळा असणार्‍या पुतळाबाई - स्वतः अत्यवस्थ असल्या तरी आमच्यासाठी यमराजांसही थांबावयांस सांगून आमच्या सेवेला धावत येतील हे काय आम्ही जाणत नाही?पुतळाबाई - ज्यांनी अहेवपणी गेलेल्या सईबाईंची हळदी कुंकवाची कोयरी - जी सोयराबाईंनी नाकारली - ती आजपावेतो जपली.....आम्ही आपले अनंत अपराधी आहोत पुतळा ! आपला दिल जाणून पण आम्ही आपल्या वाट्यास आलो नाही ! आम्ही "स्व"त्व विसरून स्वराज्य निर्माण केलं , पण हे "स्व"जनांनीच कलंकीत केलं !
गेली ३५ वर्षे अविरत हाकलेला हा स्वराज्यरथ - ज्याचा मी सारथी - तो मी पण आज कर्णासारखाच विवश ! त्याचं चाक धरेनं गिळलं , आमच्या स्वराज्य रथांस राज्याच्या असुरी लालसेनं ! जीवांस जीव देणारे हंबीरराव - त्यांस जाणूनबुजून महाराणींनी लांब धाडून दिले.....जे स्वराज्य घडविण्यात आम्ही आमची अख्खी जिंदगी खर्ची घातली , त्याचे आम्ही "राजे" होतांच एकमेव हंबीरराव सोडता समस्त अष्टप्रधान मंडळाला वंशपरंपरागत अधिकाराची हाव सुटावी? आणि सख्खी बहीण महाराणी असताना कुठलीच अपेक्षा न बाळगणार्‍या हंबीररावांच्या पाठच्या बहीणीने मात्र राज्यलालसा धरावी हा कुठला दैवदिर्विलास स्वराज्याच्या ललाटी लिहिलास रे शंभूमहादेवा ? बरे राज्यलालसा पण एकवेळ समजू शकतो , पण आजपावेतो अफूच्या मेहेरबानीवर गुंगीत ठेवलेल्या आपल्या जेमतेम १० वर्षे वयाच्या राजारामाला - स्वराज्याच्या वेशीवर दस्तक देणारा औरंगझेब आटपेल असं सोयराबाईंना वाटल्यांस नवल नाही पण या जनानी बुध्दीत बाळाजी आवजींसकट सार्‍यांचीच बुध्दी वाहून जाण्याएवढे का स्वराज्य वांझ ठरावे?
हे मृत्यो , आम्ही तुझे स्वागत करतो , ये ! समर्थ रामदांस - ज्यांनी आयुष्यभर ज्या हनुमंताची देवळे ये देशी स्थापिली , त्या रामाच्या दासाची आज जयंती ! आजच्या एव्हढा दुसरा कुठला मुहुर्त आपणाकडे येण्यांस योग्य असेल स्वामीजी? थोडा अवधी अजून देतांस हे मृत्यो , तर या जगांस आम्ही दाखवून दिले असते की आम्ही फक्त स्वराज्य निर्माण नाही केले तर ते राखणारे शंभूसारखे भावी छत्रपती पण घडविले ! पण आजन्म जे केले नाही ते आजाच आम्ही का करावे?आजच तुझ्याकडून अवधीची भिक्षा का मागावी?हे श्रीं चे राज्य घडले - या राज्यरूपी मडक्याच्या या कुंभाराच्या देहाची माती - हे स्वराज्यभूमी - हे माते , आम्हीच तुला अर्पण करतो ! देणार्‍या हतांनी अखेरीसही देतच रहावे नाही का - महारथी कर्णासारखे? ये मृत्यो , ये.....जननी जन्मभूमीच्.....जय भवानी !
आणि आता , आज , या घडीला ३२९ वर्षांनंतर , महाराष्ट्राच्या अवतीभवती घुटमळणार्‍या छत्रपतींच्या आत्म्याचे हे पण एक स्वगत.....

तलवार घेऊनी हाती
केले दीन दुबळ्यांचे रक्षण
तोच माझा वीर मराठा
मागत का फिरतो "आरक्षण" ?

मनगटांत असतां धमक
बुध्दीची अपूर्व शक्ती
"वापरांत दोन्ही नसणे"
याचेच असे हे लक्षण !

यांचसाठी झुंजलो का मी?
अन् आले कितीक कामी
पुत्रा "नागोजी" गमवून सुध्दा
करते "बाजी"स कांता औक्षण !

रानी हिंडलो धडपडलो
इतिहास घडविण्यासाठी
अन् राहिलो पुस्तकांमधुनी
देण्या बाळपणीचे शिक्षण !

मी संपलो होतो केंव्हाचा
आत्म्याची होती कण कण ,
बघुनी आजचे राजकारण
मी पुन्हा संपलो.....ये क्षण ! .....
मी पुन्हा संपलो.....ये क्षण ! .....
मी पुन्हा संपलो.....ये क्षण !

Tuesday, 22 August 2017

*तुमको न भूल पाएँगे — भाग ३*


*सप्रे*म नमस्कार मंडळी !


काल तुम्हाला मी म्हटलं तसं , रफीसाहेबांवर लिहायचं तर कितीहि लिहिलं तरी थोडंच अाहे ! अाता हेच बघा ना , काल अापण १९४५—१९४८ अशा साधारणत: ४ वर्षांच्या कारकिर्दिविषयी अाढावा घेतला व अाज अापण पुढे सरकणार होतो.पण मंडळी , माझ्यातल्या लेखकाची *क्वचित् वा अनभिज्ञ अशी माहिती रसिक वाचकांपर्यंत पोचवण्याची* खुमखुमी मला स्वस्थ बसू देईल तर ना ! कालचा लेख टाकून झाल्यावरहि अशी *खूपशी माहिती सांगायची राहून गेली — कालच्या त्या १९४८ पर्यंतच्या कालखंडात* असं मला वाटू लागलं अाणि अामची गाडी परत रिव्हर्स गिअर टाकून १९४५ सालात परंत अाली.तर मंडळी , राहिलेली माहिती अाधी सांगून मोकळा होतो या प्रवासाची गाडी चालवंत ! चला तर मग , ऐका.....


 मोहम्मद रफीबरोबर हिंदी सिनेसंगीत गाणारी पहिली पार्श्वगायिका होती अभिनेत्री व गायिका अमीरबाई कर्नाटकी.१९४५ च्या *कुलकलंक* या सिनेमात ए.अार.कुरेशी अर्थात् तबलानवाज अल्ला रखाँ साहेबांच्या { म्हणजेच उस्ताद झााकीर हुसैन व तौफिक कुरेशी यांचे वडिल — यांच्या } संगीतात रफीने *टोपीवाले बाबू ने दिल छिना रे मोरा मन छिना* हे गाणं अमीरबाईबरोबर गायलं होतं.हे गाणं अमीरबाई व अभिनेता मसूद यांच्यावर चित्रित करण्यात अालं होतं.पण हा सिनेमा १९४६ साली नांव बदलून *जीवनछाया* या नावाने प्रदर्शित झाला!


 १९४५ साली रफीने *मोहनतारा तळपदे ( माहेरची ) अजिंक्य* या गायिकेबरोबर *बेगम* या चित्रपटात *एच.पी.दास* यांच्या संगीतात *दिल दिए चले , दिल दिए चले , हम जिये चले ऐसे* हे गाणं गायलं होतं.


 १९४६ साली प्रकाश पिक्चर्सच्या *घूँघट* या चित्रपटात *निर्मलादेवी व अरूण अाहुजा* यांच्या नायक—नायिकेच्या भूमिका होत्या.व रफीने या निर्मलादेवींबरोबर *शंकरराव व्यास* यांच्या संगीतात *नैनोंसे मद मदिरा पिलाकर तुमने हमें दिवाना किया* हे गीत गायलं. हे निर्मलादेवी—अरूण अाहुजा म्हणजे अाजकालच्या { *कुछभी* } — *नंबर वन्* चित्रपटाचा हिरो *गोविंदा*चे अाई—वडील!


अभिनेत्री व गायिका असणार्‍या नूरजहाँबरोबर १९४७ मधे *जुगनू* या चित्रपटात *फिरोझ निझामी* यांच्या संगीतात रफीने नूरजहाँबरोबर *यहाँ बदला वफाका बेवफाईके सिवा क्या है* हे गाणं गायलं होतं. *गाँवकी गोरी* नंतर हे रफीचं नूरजहकँबरोबरचं दुसरं व शेवटचं गाणं! १९४७ च्या फाळणीनंतर नूरजहाँ पाकिस्तानला निघून गेली.सैगल त्या काळातला नामवंत गायक असूनहि सैगल नूरजहाँबरोबर कधीही गाऊ शकला नाहि!


अभिनेत्री असलेली अाणखीन एक गायिका म्हणजे *खुरशिद* — *तानसेन* व *भक्त सूरदास* चित्रपटातील सैगलची नायिका! १९४७ च्या *अागे बढो* या चित्रपटात *बाबूजी ऊर्फ सुधीर फडके* यांच्या संगीतात रफीने खुरशिदबरोबर *सावनकी घटा , धीरे धीरे अाना* हे *एकमेव* गाणं गायलं.फाळणीनंतर खुरशिद पण पाकिस्तानला निघून गेली !मंडळी , हि खुरशिद म्हणजे अापली सगळ्यांची अावडती मधाळ अावाजाची ट्रॅजिडी क्वीन मीनाकुमारीची मोठी बहिण.


मंडळी , अापल्या उमेदवारीच्या काळात महम्मद रफी पहाटेचा रियाझ मुंबईच्या मरीन ड्राईव्हला करायचा ! एका रात्रीत रफीला यश मिळालेलं नाहि राव! { अाणि तसं ते कुणालांच मिळत नसतं ! } ते यश मिळवण्यासाठी रफीने अपार कष्ट घेतलेत ! बांद्र्याला रहाणारा रफी दररोज पहाटे ४.३० वाजता उठून मरीन ड्राईव्हला यायचा. पहाटेचा व्यत्ययहीन शांत रियाझ करता यावा म्हणून ! त्याकाळात उमेदवारी करणार्‍या रफीला हि कल्पनाच नव्हती की अापले रियाझी स्वर एक प्रसिद्ध नटी/अभिनेत्री व गायिका मरीन ड्राईव्हवरच्या अापल्या राहत्या घरात बसून रोज ऐकत असते ! एके दिवशी मात्र त्या गायिकेला स्वस्थ बसवेना , चौकशीअंती तिला कळलं की हा स्वर्गीय अावाजाचा बोलविता धनी दुसरा तिसरा कुणीच नसून दस्तुरखुद्द मोहम्मद रफीच अाहे ! रफीला याबाबत अधिक छेडलं असता रफीने सांगितलं की तो रहात असलेली जागा खूपंच रहदारीची असल्याने त्याच्या पहाटेच्या रियाझामुळे लोकांची झोपमोड होऊ नये म्हणून तो रोज पहाटे मरीन ड्राईव्हला येत असे की जेणेकरून नीरव शांततेत त्याला व्यत्ययाविना रियाझ करता यावा!


त्या दिवसापासून मात्र पुढे वर्षभर , रफीनं दुसरं मोठ्ठं घर घेईपर्यंत , रफीचा रियाझ मरीन ड्राईव्हवरील या गायिकेच्या राहत्या घरी बिनबोभाट पार पडला !


अापल्या अावाजाची मोहिनी गोड गळ्या—चेहेर्‍याच्या त्या सुप्रसिद्ध नटीवर पाडू शकणारा रफी महान् अाणि भविष्यातील संगीतातील ध्रुवतार्‍याला अापली जागा पहाटेच्या रियझासाठी वापरू देण्याचं औदार्य दाखवणारी ती नटी पण तितकीच महान !

मंडळी ती सुप्रसिद्ध नटी/अभिनेत्री अाणि गायिका म्हणजे  *सुरैय्या* !

नूरजहाँ व खुरशिदबरोबर एकाच चित्रपटात गाणारा रफी सुरैय्या बरोबर मात्र *बालम , काजल , दुनिया , नाच , दास्तान , खिलाडी , शान , सनम , गूँज , शमा—परवाना , मिस्टर लंबू , ट्राॅली ड्रायव्हर , रंगमहल* या १३ सिनेमांत गायला.ती गाणी : *चित्रपट — साल — संगीतकार — गाण्याचे बोल* या अनुक्रमाने अशी होती.....


*काजल* — १९४८ — गुलाम महंमद — तारोंभरी रात है पर तू नहिं

*रंगमहल* — १९४८ — के.दत्ता — रूठो न तुम बहारमें

*बालम* — १९४९ — हुस्नलाल — भगतराम — अाता है जिंदगीमें भला प्यार किस तरह , अाँखें उठाओ फिर मैं बताऊँ

*दुनिया* — १९४९ — सी.रामचंद्र — हाय ये तूने क्या किया , किस्मतके लिखे को मिटा न सके

*नाच* — १९४९ — हुस्नलाल — भगतराम — सीनेमें अाग भडकती है , छाया समाँ सुहाना

*दास्तान* — १९५० — नौशाद — तारारी रारारी रारारी ये सावन रुत तुम और हम , दिलको हाय दिलको तेरी तस्वीर बहलाए हुवे हैं , बुप्पी बुप्पी बुप्पी तके धुम तके धुम...धडक धडक दिल धडके

*शान* — १९५० — हंसराज बहल — दिलके धोकेमें न अाना , हमभी अकेले तुमभी अकेले , हम तुमसे वफा करते तुम हमसे वफा करते

*खिलाडी* — १९५० — हंसराज बहल — मुहब्बतमें नजर मिलते हि , यह प्यारकी मंझिलसे मुझे किसने सदा दी

*सनम* — १९५१ — हुस्नलाल — भगतराम — ओ सनम ओ सनम मैं तुझे पुकारूँ , मैं कह दूँ तुमको चोर तो बोलो

*गूँज* — १९५२ — शार्दूल क्वात्रा — गूँज नहिं है यह पर्वतकी , ओ मेरी प्यारी मोना

*शमा—परवाना* — १९५४ — हुस्नलाल—भगतराम — सर ए महफिल जो जला परवाना , बेकरार है कोई , शाम—ए—बहार अाई करके सिंगार अाई

*मिस्टर लंबू* — १९५६ — ओ.पी.नय्यर — तू जरासी बातपे खफा न हो , तू मेरा दिलरुबा मैं तेरी दिलरुबा

*ट्राॅली ड्रायव्हर* — १९५८ — हुस्नलाल — भगतराम — यह रात यह नजारे , अा जाओ अा भी जाओ


मंडळी ,  अाता मी तुम्हाला एका अशा गाण्याबद्धल माहिती सांगणार अाहे , ज्या गाण्याने सैगल व करण दीवान या गायकांच्या सुप्रसिद्ध विरहगीतांचा वारसा पुढे चालवला.....ते गाणं होतं रफीने गायलेलं *इस दिलके टुकडे हजार हुए कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा* ......

या गाण्याचं नशिबंच वेगळं होतं व त्याचे दोन किस्से अाज मी तुम्हाला सांगणार अाहे.ऐका तर मग......


१९४७ साली फिल्मिस्तानचे सर्वेसर्वा शशधर मुखर्जी यांनी *सिंदूर* नामक एक चित्रपट काढला. कमर जलालाबादींनी *इक दिलके टुकडे हजार हुवे* हे गीत लिहिलेलं.पण या गीताचा मुखडा वाचताच शशधर मुखर्जींनी तो कागद फेकून दिला व कमरना सुनावलं , "ही असली भिकार गाणी चित्रपटासाठी लिहित जाऊ नका! प्रेक्षक असली गाणी चित्रपटात कधीच चालवून घेणार नाहित!"
गीताचा कागद उचलून कमर बाहेर पडले.

पुढे १९४८ मधे *प्यारकी जीत* नावाचा चित्रपट ओ.पी.दत्ता दिग्दर्शित करंत होते { १९९७ च्या *बाॅर्डर* चे दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांचे वडील }.एका विरह गाण्याची situation निर्माण झाली व कमरनी हाच कागद ओ.पी.दत्तांपुढे सरकवला.कागदावरील गाण्याचा मुखडा वाचताक्षणीच ओ.पी.दत्तांना ते इतकं अावडलं की त्यांनी हुस्नलाल—भगतराम या संगीतकार जोडीला गाणं संगीतबद्ध करायला सांगून गाणं चित्रपटात सामाविष्ट केलं !

मंडळी अाता याच गाण्याचा दुसरा किस्सा.....

१९४७ सालचा *जुगनू* रिलीज होईपर्यंत ज्वार भाटा , प्रतिमा , मिलन या तीन चित्रपटात काम करूनहि दिलीपकुमार नायक म्हणून प्रेक्षकांना तितकासा भावला नव्हता.पण *जुगनू* रिलीज झाला अाणि रफीच्या *यहाँ बदला वफाका* या गाण्याने त्याला नायक म्हणून मान्यता मिळवून दिली.पण हि मान्यता खरं तर *रहमानला* मिळायची होती.अभिनेत्री व गायिका नूरजहाँचे पती शौकत हुसेन जुगनूचे निर्माते—दिग्दर्शक होते.त्यांना नूरजहाँबरोबर जुगनूत नायक म्हणून रहमान हवा होता.पण फेमस पिक्चर्सच्या करारात बांधला गेलेला रहमान त्यांच्या संमतीशिवाय अन्य कुठल्या चित्रसंस्थेच्या चित्रपटात काम करू शकत नव्हता!अाणि फेमस पिक्चर्सचे सर्वेसर्वा बाबुराव पै हे रहमानला घेऊन *नर्गिस* चित्रपटाच्या निर्मितीच्या तयारीत होते व त्यांना *नर्गिस*साठी रहमानबरोबर नायिका म्हणून नूरजहाँ हवी होती.त्यामुळे *जुगनू*साठी शौकत हुसेननी रहमानला नायकाची अाॅफर देताच बाबूराव पैंनी *जुगनू साठी रहमान* च्या बदल्यात *नर्गिस साठी नूरजहाँ* अशी Counter Offer दिली.पण शौकत हुसेन ला हि Counter Offer नामंजूर असल्याने *नर्गिस* मधे रहमानसोबत बाबूराव पैंनी नर्गिसला नायिका म्हणून उभी केली अाणि इकडे शौकत हुसेननी *जुगनू* मधे नूरजहाँसोबत नायक म्हणून दिलीपकुमारला उभं केलं अाणि पुढे मग रफीच्या *यहाँ बदला वफाका* या वीराणीवर दिलीपकुमारवर देवदास छाप नायकाचं शिक्कामोर्तब झालं.


पुढे १९४८ मधे *प्यारकी जीत* साठी रहमान नायक म्हणून निवडला गेला अाणि रफीच्या *इक दिलके टुकडे हजार हुवे* या विरहगीतावर नायक म्हणून मान्यता पावला !


मंडळी , अशा प्रकारे रफी पण *इक दिलके टुकडे हजार हुवे* या विरहगीताच्या लोकप्रीयतेमुळे सैगलच्या नंतर विरहगीत गायक म्हणून मान्यता पावला !


अशा प्रकारे १९४८ साल हे रफीसाठी पायाभरणीचं साल ठरलं , कारण त्यानंतर रफीने चित्रपटात सगळ्यात जास्त विरहगीतं गायली!


तर मंडळी , विरहगीतांच्या भक्कम पायावर उभी राहिलेली  *मोहम्मद रफी* ची कारकीर्द  पुढे कशी बुलंद घडंत गेली ते उद्याच्या भागापासून पाहूया.

कळावे ,

अापला विनम्र ,

*उदय गंगाधर सप्रे*म—ठाणे
तुमको न भूल पाएँगे—भाग २

सप्रेम नमस्कार !

मंडळी , काल अापण बघितलं की रफीने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं तीन गुरुंकडून.पंडित जीवनलाल मट्टो यांच्याकडून रागांमधील बारकावे तसंच पंजाबी लोकगीतातील राग पहाडी , भैरवी , बसंत अाणि मल्हार शिकला.
त्यानंतर तो किराणा घराण्याचे उस्ताद वहाद खान व पटियाला घराण्याचे उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकला.
याखेरीज , अाॅल इंडिया रेडियो — लाहोरमधील एक निर्माते फिरोझ निझामी यांचीहि तालीम रफीने घेतली.

मंडळी , रफीची सिनेमातील गाण्याची सुरूवात तशी १९४१ मधेच म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षी लाहोर रेडिओवर तो गायला लागला त्याच वर्षी संगीतकार शामसुंदर यांच्या *गुलबलोच* या पंजाबी सिनेमातील झीनत बेगम या गायिकेसोबत गायलेल्या *सोणिये नी , हीरीये नी* या युगुलगीताने झाली.पण हा सिनेमा ३ वर्षांनी  १९४४ साली रिलीझ झाला. या गाण्यातल्या रफीचा अावाज ऐकून निर्माता नसीर यांनी रफीला मुंबईला बोलावले.
अब्दुल हमीद अाणि मोहम्मद रफी मुंबईला जायला सज्ज झाले.परंतू रफीचे वडील मोहम्मद हाजी अली यांना रफीने लाहोर सोडणं पसंत नव्हतं.त्यांनी लाहोर स्टेशन सोडताना रफीला सांगितलं , "यश मिळालं नाहि तर परत येऊ नकोस ! मला रफी नावाचा एक मुलगा होता हेहि मी विसरून जाईन!"
पण पत्थरदिल वाटला तरी बाप हा *बापमाणूस* असतो! मोहम्मद हाजी अलींनी अापला मित्र वाजीद अली याच्याकडून एक शिफारसीचं पत्र त्याच्या मुलाच्या नावे म्हणजे संगीतकार नौशाद अलींच्या नावे लिहवून घेतलं व ते पत्र रफीजवळ दिलं!

मुंबईमधे अाल्यावर अब्दुल हमीद व मोहम्मद रफी भेंडी बाजारमधे एका १०' X १०' च्या खोलीत राहू लागले.अाल्याअाल्याच संगीतकार शामसुंदर यांनीच हिंदी चित्रपटात गायची संधी रफीला दिली. *गाँवकी गोरी* या चित्रपटात गायक जी.एम.दुराणीबरोबर गायलेलं रफीचं पहिलं हिंदी गाणं होतं *अजी दिल हो काबूमें तो दिलदारकी ऐसी तैसी* , पण पडद्यावर हा चित्रपट उशिरा म्हणजे १९४५ ला अाल्याने रफीच्या पहिल्या हिंदी गाण्याचा मान संगीतकार नौशाद अलींकडे गेला!

त्याचं असं झालं.....

वाजीद अलींचं शिफारसपत्र घेऊन रफी नौशादकडे गेला व नौशाद अलींना एक गझल म्हणून दाखवली.तेंव्हा नौशादनी *पहले अाप* या चित्रपटात जो १९४४ ला रिलीझ झाला , त्यात गायक व अभिनेते शामकुमार व अल्लाउद्दीन यांच्यासोबत *हिंदोस्ताँ के हम है हिंदोस्ताँ हमारा* हे गाणं रेकाॅर्ड केलं व १९४४ मधेच नावाप्रमाणेच *पहले अाप* रिलीझ झाल्याने ह्याच गाण्याला *रफीचं पहिलं हिंदी गाणं* हा मान मिळाला!
हे गीत एक परेडगीत होतं व गाण्यात परेडचा इफेक्ट निर्माण करण्यासाठी पायातील बुटांचा अावाज must होता!यासाठी रेकाॅर्डींगच्या वेळी रफीला पायात मिलिटरीचे वजनदर बूट घालून टपटप असा अावाज काढावा लागला.गाण्याचा ताल सांभाळून रिटेकवर रिटेक्स करंत गाणं फायनल होईपर्यंत तरणाबांड रफी थकून गेला!या गाण्यानंतर १९४५ मधे *गाँवकी गोरी* चं *अजी दिल हो काबूमें* रिलीझ झालं.....

नंतर अाला १९४५ मधे *लैला मजनू* , याचे दोन संगीतकार होते पं.गोविंदराम व रफीक गजनवी.या चित्रपटात रफीनं दोन गाणी गायली : *सखीकी खैर माई बाबाकी खैर तेरी* — यात शिवदयाल बातिश व खान मस्ताना यांच्यासोबत रफी गायला.हे गाणं लैला खैरात वाटत असता ती स्वीकारणार्‍या फकिरांवर चित्रित करण्यात अालं होतं व  *एका फकिराच्या भूमिकेत पडद्यावर दिसला होता दस्तुरखुद्द मोहम्मद रफी!* यातलं दुसरं गाणं रफीने बातिशबरोबर गायलं *तेरा जल्वा जिसने देगा वो दीवाना हो गया*

यानंतर १९४६ मधे अालेल्या *अनमोल घडी* या चित्रपटातील *तेरा खिलौना टूटा बालक* हे गाणं रफीनं नौशादकडेच गायलं व ते गाजलं.पण हे गाणं काहि चित्रपटातील नायकाच्या तोंडी नव्हतं तर, खेळणीवाल्या एका नगण्य नटाच्या तोंडी होतं!
*अनमोल घडी* च्या *खिलौना* गाण्यानं नौशादना रफीच्या गायकीबद्धल विश्वास वाटू लागल्यावर १९४६ मधेच निर्माता ए.अार.कारदार यांच्या *शाहजहाँ* मधे नौशादने त्याला के.एल्.सेहगलसोबत गायला उभा केला : *मेरे सपनोंकी रानी रूही रूही*..... मंडळी , रफी उदयाला येत असताना अनेक गायकांनी सैगलचा अादर्श ठेवत त्याची नक्कल केली.पण *कुणाचीहि नक्कल न करणार्‍या अस्सल रफीलाच फक्त सैगलसोबत गाण्याची संधी मिळाली!* उदा. १९४५ : *पहली नजर* मधील मुकेशचं *दिल जलता हैं तो जलने दे* ; १९४८ : *जिद्दी* मधील किशोर कुमारचं *मरनेकी दुवाएँ क्यूँ माँगे* { किशोर कुमारने गायलेलं पहिलं गाणं ! }
अाणि नंतर सैगलबरोबर गाण्याची संधी कुणालाहि मिळाली नाहि ..... कारण १८ जानेवारी १९४७ ला सैगल अापल्यातून निघून गेला......

एंव्हाना रफीने अापल्याच नात्यातील बशीरा बानूशी विवाह केला होता व त्यांना शाहिद नावाचा मुलगा पण झाला होता.एवढ्यात हिंदुस्थानची फाळणी झाली व बशिरा बानूने दंग्यांच्या भितीने रफीसोबत हिंदुथानात रहाण्यास नकार दिला.शाहिद रफीसोबत मुंबईतंच राहिला.यानंतर रफीने व अब्दुल हमीदने दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केलं.रफी व दुसरी पत्नी बिल्कीस बानू यांना अनुक्रमे नसरीन , खालिद , परवीन व हमीद अशा संततींची प्राप्ती झाली.

मंडळी , पूर्वी नटंच अापली गाणी म्हणत असंत.पण रफीयुगाची सुरुवात झाली अाणि बर्‍याच नटांना रफीचा अावाज पार्श्वगायक म्हणून वापरला जाऊ लागला.साहजिकंच मग अशा नट लोकांचे *पडद्यामागचे अावाज* बंद झाले.असे नट होते :

अशोक कुमार : १९४७ *साजन* मधे सी.रामचंद्र यांच्या *हमको तुम्हारा हि अासरा , तुम हमारे हो न हो* या गाण्यापासून.

ईश्वरलाल : १९४५ *शरबती अाँखे* मधे *प्यार करनाहि पडेगा एक दिन* या गाण्यापासून.

मंडळी अशा बर्‍याच अाठवणी अाहेत ,पण रफीची १९४४ पासूनची ३६ वर्षांची कारकीर्द टप्प्याटप्प्याने अाजपासून १२ लेखांमधे उलगडंत जाईल.तर अाज साधारणपणे १९४४ ते १९४८ सालांचा ढोबळमानाने अापण अाढावा घेतला.माझ्याकडे माहिती भरपूर अाहे , पण ती सगळी इथे दिली तर एक *रफी सप्रेम* { किंबहुना *रफी*स *प्रेम* } असं पुस्तकंच तयार होईल!

तर अाज थांबण्यापूर्वी एक रंजक अाठवण सांगतो.अापले सर्वांचे लाडके गायक—संगीतकार बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्या पत्नी ललिता देऊळकर या १९४७ मधे *साजन* मधे सी.रामचंद्र म्हणजेच अण्णा चितळकर यांच्या संगीतात रफीबरोबर प्रथम गायल्या. *किसको सुनाऊँ हाल—ए—दिल , हमको तुम्हाराहि अासरा , तुम हमारे हो न हो* या गाण्यात.रफी या गाण्याच्या वेळी एक नवा गायक होता अाणि ललिताबाई टाॅपच्या गायिका.
याचं मानसिक दडपण रफीवर अालं होतं.त्यामुळे तो गाताना चुकंत होता व घाबरंत होता.ललिताबाईंच्या हे लक्षात अालं व त्यांनी रफीला धीर दिला.नंतर हे गाणं व्यवस्थित रेकाॅर्ड झालं. या उपकारांची जाण ठेऊन रफीने सुधीर फडके व ललिता देऊळकर यांच्या विवाहात *मराठी मंगलाष्टकं म्हटली !* { हि हकिगत बाबुजींचे चिरंजीव यांनाहि कदाचित् माहिती नसेल ! }

जाता जाता अाणखीन एक रोचक अाठवण सांगतो....
१९४७ च्या *जुगनू* पासून दिलीपकुमारसाठी रफी गायला लागला अाणि याच चित्रपटात रफी १९४५ *लैला मजनू* नंतर परंत एकदा  पडद्यावर दिसला होता!

मंडळी , रफीसाहेब हा एक मोठा अध्याय अाहे व तमाम जनतेला जे माहित अाहे , तेच परत लिहिण्याऐवजी जे माहित नाहि तेवढं रोचकतेने मांडण्याचा मी प्रयास केलाय.एरवी  ५६ वर्षांतील *रफी* १४ भागांत मांडणं हे एक शिवधनुष्यंच अाहे!

चला , अाता पुढच्या भागासह उद्या भेटू!
अापला विनम्र,
*उदय गंगाधर सरे*म—ठाणे
*तुमको न भूल पाएँगे — भाग १*

सुप्रभात अाणि *सप्रे*म नमस्कार मंडळी !
कसं काय मंडळी मजेत ना?अाणि अापला नेहेमीचा अापुलकीचा प्रश्न " *वाचताय ना?* वाचायलच पाहिजे , कारण घेऊन अालोय तुमच्या अावडीचा कार्यक्रम *उदय सप्रे*म प्रस्तुत "चला , { अानंदाने } जगण्याची दवा येऊ द्या !" { झी अाणि डाॅ.नीलेश साबळेंची क्षमा मागून ! 😜 }

मंडळी , अापण अनेकदा वाचलंय की अमुक तमुक व्यक्तीला अमुक तमुक संन्यासी बाबांनी वा बुवांनी अाशीर्वाद दिला की "जा बाळ , तू मोठ्ठा कलाकार होशील!" अाणि मग तो अमुक तमुक इसम खरंच तसा घडतो ! पचवायला जड असतात अशा गोष्टी पण अाज मी तुम्हाला एक अशी हकिगत सांगणार अाहे की जी वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की या हकीगतीमधला हा बालक , जो मोठेपणी एक अद्वितीय कलाकार व एक उत्कृष्ट माणूस म्हणून नावारूपाला अाला अाणि ज्याचं संपूर्ण श्रेय हे त्याला अाशीर्वाद देणार्‍या त्या अनामिक गुमनाम फकिराचं नसून त्या बालकाच्या स्वत:च्या वेडात अाणि त्या वेडापायी एकेकाळी सर्व त्याग करून घेतलेल्या अविश्रांत मेहनतीचं अाहे! चला तर मग , सुरुवात करतो.....

पंजाबमधल्या अमृतसरमधे कोटला सुलतानसिंग नावाचं एक खेडेगांव.तिथे मोहम्मद हाजी अली नावाचे एक गृहस्थ रहात — त्यांना असलेल्या ६ मुलांपैकी दुसर्‍या क्रमांकाचा मुलगा होता *फिको* .
कालांतराने मोहम्मद हाजी अली यांनी लाहोरला स्थलांतर केलं अाणि तिथे ते भाटीगेट येथील नूर मोहल्ल्यात एका माणसाचं सलून चालवत.फिको एंव्हाना ६ वर्षांचा झाला होता.गल्लीमधे येणारे एक फकीर गाणं गाऊन खैरात मागायचे. { अापल्या महाराष्ट्रात याला *वासुदेव* म्हणतात ! } फिकोला त्यांचा अावाज प्रचंड अावडायचा.त्यामुळे फिको त्यांच्या मागेमागे फिरायचा.फकीर दमून कुठेतरी अारामासाठी टेकायचा अाणि त्या वेळात हा चिमुरडा फिको त्या फकिराच्या गाण्यांचा सराव करायचा.हळुहळु फिकोच्या जीवनातला हा एक नित्यक्रमंच होऊन गेला होता.एक दिवस त्या फकिराने फिकोला अापली गाणी म्हणताना ऐकलं , तो प्रसन्न झाला व फिकोला कडेवर घेतलं ! { हल्लीच्या ६ वर्षाच्या मुलाला कडे *ला* घ्यावं लागतं ! } फकीर फिकोला म्हणाला , "बाळ , तू एक दिवस खूप मोठा गायक होशील!"तेंव्हा फिको अवघ्या ६ वर्षांचा होता!
फिकोचा मोठा भाऊ मोहम्मद दीन याचा एक मित्र होता — अब्दुल हमीद.
या फकीरबाबा घटनेनंतरंच काहि दिवसांनी फिको हमीदबरोबर एका दुकानात गेला होता.फिको पंजाबी गाणं गुणगुणंत होता.संगीतातील कुणी उस्ताद काहि खरेदीसाठी तिथे अाले होते.फिकोचं गाणं ऐकून प्रभावित होत त्यांनी हमीदला सांगितलं ' "या लहान वयात इतका गोडवा असलेला हा मुलगा मोठेपणी महान गायक झाल्याशिवाय रहाणार नाहि!"
हमीदनं हे फिकोचं कौतुक फिकोच्या अब्बूंपर्यंत पोचवलं अाणि फिकोचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झालं — उस्ताद अब्दुल वाहिद खान , उस्ताद छोटे गुलाम अली खाँ , पंडित जीवनलाल मुट्टो यांच्याकडे!
फकीरबाबाचा अाशीर्वाद फळला.....बोलाफुलाला गाठ पडते कधी कधी.....फिकोच्या बाबत ते लवकरंच घडायचं होतं.त्याचं असं झालं.....
हमीदला फिकोचा गाण्याबद्धलचा लळा ठाऊक होता.एकदा लाहोरमधे एका मोठ्या प्रथितयश गायकाचा कार्यक्रम होता.फिकोच्या मोठ्या भावाचा मित्र —अब्दुल हमीद  फिकोला घेऊन त्या कार्यक्रमाला गेला.खच्चून गर्दी जमलेली.गायक महाशय माईकसमोर येऊन गायला लागले अाणि काहि सेकंदांतंच माईकची तांंत्रिक व्यवस्था फेल झाली.त्यामुळे गायक महाशयांचं गाणं काहि श्रोत्यांपर्यंत पोचेना.श्रोत्यांचा अारडाओरडा सुरु झाला. अायोजक हवालदिल ! तेंव्हा हमीदनं मौकेपे चौका मारायचं ठरवलं.तो फिकोला घेऊन अायोजकांकडे गेला व माईकशिवाय फिकोला रंगमंचावर गायला संधी द्यायची विनंती केली ! बारकुड्या १४ वर्षांच्या फिकोला बघून अायोजकांना खात्री वाटणं शक्यंच नव्हतं { तसं तर काय १९८९ ला कराचीमधे क्रिकेट कसोटिमधे भारताच्या ४१ ला ४ बाद अशा दयनीय अवस्थेत असताना ६ व्या क्रमांकावर खेळायला अालेल्या बारकुड्या १६ वर्षांच्या सचिन तेंडुलकरविषयी पण कुणाला खात्री होती म्हणा ! पण पहिला बाऊन्सर व दुसरा बीट झालेला गुड लेंग्थ चेंडू विसरत सचिननं लाँग अाॅनला सणसणीत चौकार ठोकून — बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या धर्तीवर *अापली बॅट मैदानात* दाखवून दिलीच की महाराजा ! }
पण अाता हा बारकुडा फिको पण अायोजकांना देवदूतासारखा भासला व त्यांनी फिकोला गायला परवानगी दिली ! त्यादिवशी माईकशिवाय अापल्या खणखणीत अावाजात फिको असा काहि गायला की जनता खुश व गायक महाशय पण एकदम प्रभावित ! त्यांनी फिकोला अाशीर्वाद दिला : "एक दिवस तू मोठ्ठा गायक होशील !"
माईकशिवाय शेवटच्या रांगेपर्यंत अावाज पोचवणार्‍या फिकोवर खूश होत पुढे त्या महान गायकाने लाहोर रेडिओकडे त्याची शिफारस केली अाणि त्यामुळे फिकोला रेडिओ लाहोरवर गायची संधी मिळाली!
त्याची लाहोर रेडिओवरची गाणी ऐकून संगीतकार शामसुंदर प्रभावित झाले व त्यांनी फिकोच्या कामगिरीवर खुश होऊन लवकरंच *गुलबलोच* नामंक अापल्या संगीत दिग्दर्शनाखाली फिकोकडून *सोणिये नी हीरिये नी* हे झीनत बेगम बरोबरचं युगुल गीत गाऊन घेतलं व अशा प्रकारे १९४१ साली रिलीज झालेल्या पंजाबी गाण्याद्वारे अापल्या सिनेजगतातील पार्श्वगायक म्हणून फिको नं वयाच्या १७ व्या वर्षी पदार्पण केलं !
मंडळी , ज्या प्रथितयश गायकानं फिकोचं कौतुक करंत अाशीर्वाद दिला तो महान गायक म्हणजे कुंदनलाल ऊर्फ के.एल्.सेहगल अाणि हिंदी—उर्दू मातृभाषा असून ज्यानं पंजाबी गाण्यानं अापल्या पार्श्वगायनाची सुरुवात करत पुढे ३९ वर्षं हिंदी सिनेजगतात अापलं ध्रुवपद निर्माण केलं , तो हा फिको म्हणजेच *२४ डिसेंबर १९२४* रोजी जन्मलेला अाणि वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी *३१ जुलै १९८०* रोजी रात्री १०.२५ ला अल्लाला प्यारा झाला , तो  फिको म्हणजे *मोहम्मद रफी*!

मंडळी *रफी* हा एक शब्दातीत विषय अाहे ! अहो , त्याच्या करिअरच्या सुरुवातीपर्यंतचा हा लेख ! ज्या फकिराच्या अाशीर्वादाने करिअर सुरु झालं ते गाणं दस्तुरखुद्द रफी गात असलेल्या मुलाखतीची दुर्मिळ LINK पुढे { *लेख संपल्यावर वेगळी* } देत अाहे , जुनं रेकाॅर्डिंग असल्याने अधिक सुस्पष्ट अावाजासाठी हेडफोन्स लावून ऐका..


अाता अाजची थीम : ज्यावर गाणी अपेक्षित अाहेत :

*चंदा / चांद / चाँदनी* या शब्दांचा उल्लेख असलेली रफीची *Solo गाणी*


अापला विनम्र,
*उदय गंगाधर सप्रे*म—ठाणे🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
सुप्रभात मंडळी , *सप्रे*म नमस्कार!
उद्या तारीख १८ जुलैपासून ३१ जुलै पर्यंत रफीच्या पुण्यतिथीनिमित्त मी लेखमाला सुरु करतोय { म्हणजे प्रयत्न करतोय ! } या संदर्भात रोज एक थीम असेल अाणि त्याला अनुसरून अापण गाणी टाकायची अाहेत , परंतू *कृपया थीम ला सुयोग्य अशीच गाणी टाकावीत हि नम्र विनंती!* कारण लेखमालेला एक प्रवाहि क्रम ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल.त्यामुळे रफीवरील प्रेमापोटि भारंभार व थीमशी असंबंधित गाणी टाकू नयेत! अाणि कृपया गाणी Repeat होणार नाहित याची काळजी घ्यावी. मुद्दाम कुणीहि करंत नाहि पण म्हणून होणारा मनस्ताप टळंत नाहि! तेंव्हा अापअापसात { व्यक्तिगत WhatsApp वर ठरवून } गाणी टाकावीत हि अपेक्षा , उगाच दुनियाभरची चर्चा ग्रूपवर नको !

अापण संगीतप्रेमी अाहोत तसेच उल्हासनगरला डाॅ.प्रभू अाहुजा नामक एक अवलिया व्यक्तिमत्व अाहे , यांनी *रफी फॅन क्लब* नावाचा एक क्लब स्थापन केलाय अाणि यासाठी त्यांनी एक 1 BHK चा फ्लॅट पण स्वखर्चाने अापल्या घरा व हाॅस्पीटल शेजारीच घेतला अाहे.अाणि इथे वर्षभर रिहर्सल्स चालतात.रफीच्या वाढदिवसाला धरुन २४ डिसेंबर व पुण्यतिथीला धरून असे २ अाॅर्केस्ट्राचे कार्यक्रम होतात , ज्यात रफीची गाणी म्हणणार्‍या कुणाहि व्यक्तीला संधी ते देत असतात व यासाठीचा सर्व खर्च व अायोजन गेली १७ वर्षे डाॅ.अाहुजासाहेब करंत असतात ! त्यांच्यावर अाणखीनहि कधीतरी लिहिन .
काल त्यांना भेटून अालो. डाॅ.अाहुजासाहेबांना व त्यांच्या सौ. डाॅ.अाशाताई { माहेरच्या डाॅ.पेंडसे } ज्या स्वत: गायिका अाहेत , अशा या रफीप्रेमी युगुलाला वंदन करून या रफी विशेष लेखमालेची सुरुवात करतो.डाॅक्टरसाहेब व अाशाताई { काय योगायोग अाहे : रफीने सर्वात जास्त युगुलगीते गायली त्या पण भोसले  अाशाताईच! } तुम्हाला सलाम ! 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼

जाता जाता , अख्ख्या सिनेजगतातंच नव्हे तर भारतामधे ज्या कलाकाराबद्धल एकंहि अवाक्षर कधी ऐकायला मिळलं नाहि , उलटपक्षी या देवमाणसाची स्तुतीच ऐकायला मिळाली , त्या रफीच्या नावाने *मुंबईतील { अाणि कदाचित् भारतातील हि ! } एकमेव मार्ग डाॅक्टरसाहेबांच्या प्रयत्नांनी निर्माण झालाय* त्या कोनशिलेचा फोटो अापणांसारख्या तमाम रसिकांसाठी पुढे पाठवत अाहे !

अाणि रफीसाठी हसरत जयपुरींच्या भाषेत एवढंच म्हणतो :
चाहे कहिंभी तुम रहो , चाहेंगे तुमको उम्रभर , *तुमको न भूल पाएँगे*
*उदय गंगाधर सप्रे*म—ठाणे
💐💐💐💐💐