Tuesday, 22 August 2017

तुमको न भूल पाएँगे—भाग २

सप्रेम नमस्कार !

मंडळी , काल अापण बघितलं की रफीने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं तीन गुरुंकडून.पंडित जीवनलाल मट्टो यांच्याकडून रागांमधील बारकावे तसंच पंजाबी लोकगीतातील राग पहाडी , भैरवी , बसंत अाणि मल्हार शिकला.
त्यानंतर तो किराणा घराण्याचे उस्ताद वहाद खान व पटियाला घराण्याचे उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकला.
याखेरीज , अाॅल इंडिया रेडियो — लाहोरमधील एक निर्माते फिरोझ निझामी यांचीहि तालीम रफीने घेतली.

मंडळी , रफीची सिनेमातील गाण्याची सुरूवात तशी १९४१ मधेच म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षी लाहोर रेडिओवर तो गायला लागला त्याच वर्षी संगीतकार शामसुंदर यांच्या *गुलबलोच* या पंजाबी सिनेमातील झीनत बेगम या गायिकेसोबत गायलेल्या *सोणिये नी , हीरीये नी* या युगुलगीताने झाली.पण हा सिनेमा ३ वर्षांनी  १९४४ साली रिलीझ झाला. या गाण्यातल्या रफीचा अावाज ऐकून निर्माता नसीर यांनी रफीला मुंबईला बोलावले.
अब्दुल हमीद अाणि मोहम्मद रफी मुंबईला जायला सज्ज झाले.परंतू रफीचे वडील मोहम्मद हाजी अली यांना रफीने लाहोर सोडणं पसंत नव्हतं.त्यांनी लाहोर स्टेशन सोडताना रफीला सांगितलं , "यश मिळालं नाहि तर परत येऊ नकोस ! मला रफी नावाचा एक मुलगा होता हेहि मी विसरून जाईन!"
पण पत्थरदिल वाटला तरी बाप हा *बापमाणूस* असतो! मोहम्मद हाजी अलींनी अापला मित्र वाजीद अली याच्याकडून एक शिफारसीचं पत्र त्याच्या मुलाच्या नावे म्हणजे संगीतकार नौशाद अलींच्या नावे लिहवून घेतलं व ते पत्र रफीजवळ दिलं!

मुंबईमधे अाल्यावर अब्दुल हमीद व मोहम्मद रफी भेंडी बाजारमधे एका १०' X १०' च्या खोलीत राहू लागले.अाल्याअाल्याच संगीतकार शामसुंदर यांनीच हिंदी चित्रपटात गायची संधी रफीला दिली. *गाँवकी गोरी* या चित्रपटात गायक जी.एम.दुराणीबरोबर गायलेलं रफीचं पहिलं हिंदी गाणं होतं *अजी दिल हो काबूमें तो दिलदारकी ऐसी तैसी* , पण पडद्यावर हा चित्रपट उशिरा म्हणजे १९४५ ला अाल्याने रफीच्या पहिल्या हिंदी गाण्याचा मान संगीतकार नौशाद अलींकडे गेला!

त्याचं असं झालं.....

वाजीद अलींचं शिफारसपत्र घेऊन रफी नौशादकडे गेला व नौशाद अलींना एक गझल म्हणून दाखवली.तेंव्हा नौशादनी *पहले अाप* या चित्रपटात जो १९४४ ला रिलीझ झाला , त्यात गायक व अभिनेते शामकुमार व अल्लाउद्दीन यांच्यासोबत *हिंदोस्ताँ के हम है हिंदोस्ताँ हमारा* हे गाणं रेकाॅर्ड केलं व १९४४ मधेच नावाप्रमाणेच *पहले अाप* रिलीझ झाल्याने ह्याच गाण्याला *रफीचं पहिलं हिंदी गाणं* हा मान मिळाला!
हे गीत एक परेडगीत होतं व गाण्यात परेडचा इफेक्ट निर्माण करण्यासाठी पायातील बुटांचा अावाज must होता!यासाठी रेकाॅर्डींगच्या वेळी रफीला पायात मिलिटरीचे वजनदर बूट घालून टपटप असा अावाज काढावा लागला.गाण्याचा ताल सांभाळून रिटेकवर रिटेक्स करंत गाणं फायनल होईपर्यंत तरणाबांड रफी थकून गेला!या गाण्यानंतर १९४५ मधे *गाँवकी गोरी* चं *अजी दिल हो काबूमें* रिलीझ झालं.....

नंतर अाला १९४५ मधे *लैला मजनू* , याचे दोन संगीतकार होते पं.गोविंदराम व रफीक गजनवी.या चित्रपटात रफीनं दोन गाणी गायली : *सखीकी खैर माई बाबाकी खैर तेरी* — यात शिवदयाल बातिश व खान मस्ताना यांच्यासोबत रफी गायला.हे गाणं लैला खैरात वाटत असता ती स्वीकारणार्‍या फकिरांवर चित्रित करण्यात अालं होतं व  *एका फकिराच्या भूमिकेत पडद्यावर दिसला होता दस्तुरखुद्द मोहम्मद रफी!* यातलं दुसरं गाणं रफीने बातिशबरोबर गायलं *तेरा जल्वा जिसने देगा वो दीवाना हो गया*

यानंतर १९४६ मधे अालेल्या *अनमोल घडी* या चित्रपटातील *तेरा खिलौना टूटा बालक* हे गाणं रफीनं नौशादकडेच गायलं व ते गाजलं.पण हे गाणं काहि चित्रपटातील नायकाच्या तोंडी नव्हतं तर, खेळणीवाल्या एका नगण्य नटाच्या तोंडी होतं!
*अनमोल घडी* च्या *खिलौना* गाण्यानं नौशादना रफीच्या गायकीबद्धल विश्वास वाटू लागल्यावर १९४६ मधेच निर्माता ए.अार.कारदार यांच्या *शाहजहाँ* मधे नौशादने त्याला के.एल्.सेहगलसोबत गायला उभा केला : *मेरे सपनोंकी रानी रूही रूही*..... मंडळी , रफी उदयाला येत असताना अनेक गायकांनी सैगलचा अादर्श ठेवत त्याची नक्कल केली.पण *कुणाचीहि नक्कल न करणार्‍या अस्सल रफीलाच फक्त सैगलसोबत गाण्याची संधी मिळाली!* उदा. १९४५ : *पहली नजर* मधील मुकेशचं *दिल जलता हैं तो जलने दे* ; १९४८ : *जिद्दी* मधील किशोर कुमारचं *मरनेकी दुवाएँ क्यूँ माँगे* { किशोर कुमारने गायलेलं पहिलं गाणं ! }
अाणि नंतर सैगलबरोबर गाण्याची संधी कुणालाहि मिळाली नाहि ..... कारण १८ जानेवारी १९४७ ला सैगल अापल्यातून निघून गेला......

एंव्हाना रफीने अापल्याच नात्यातील बशीरा बानूशी विवाह केला होता व त्यांना शाहिद नावाचा मुलगा पण झाला होता.एवढ्यात हिंदुस्थानची फाळणी झाली व बशिरा बानूने दंग्यांच्या भितीने रफीसोबत हिंदुथानात रहाण्यास नकार दिला.शाहिद रफीसोबत मुंबईतंच राहिला.यानंतर रफीने व अब्दुल हमीदने दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केलं.रफी व दुसरी पत्नी बिल्कीस बानू यांना अनुक्रमे नसरीन , खालिद , परवीन व हमीद अशा संततींची प्राप्ती झाली.

मंडळी , पूर्वी नटंच अापली गाणी म्हणत असंत.पण रफीयुगाची सुरुवात झाली अाणि बर्‍याच नटांना रफीचा अावाज पार्श्वगायक म्हणून वापरला जाऊ लागला.साहजिकंच मग अशा नट लोकांचे *पडद्यामागचे अावाज* बंद झाले.असे नट होते :

अशोक कुमार : १९४७ *साजन* मधे सी.रामचंद्र यांच्या *हमको तुम्हारा हि अासरा , तुम हमारे हो न हो* या गाण्यापासून.

ईश्वरलाल : १९४५ *शरबती अाँखे* मधे *प्यार करनाहि पडेगा एक दिन* या गाण्यापासून.

मंडळी अशा बर्‍याच अाठवणी अाहेत ,पण रफीची १९४४ पासूनची ३६ वर्षांची कारकीर्द टप्प्याटप्प्याने अाजपासून १२ लेखांमधे उलगडंत जाईल.तर अाज साधारणपणे १९४४ ते १९४८ सालांचा ढोबळमानाने अापण अाढावा घेतला.माझ्याकडे माहिती भरपूर अाहे , पण ती सगळी इथे दिली तर एक *रफी सप्रेम* { किंबहुना *रफी*स *प्रेम* } असं पुस्तकंच तयार होईल!

तर अाज थांबण्यापूर्वी एक रंजक अाठवण सांगतो.अापले सर्वांचे लाडके गायक—संगीतकार बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्या पत्नी ललिता देऊळकर या १९४७ मधे *साजन* मधे सी.रामचंद्र म्हणजेच अण्णा चितळकर यांच्या संगीतात रफीबरोबर प्रथम गायल्या. *किसको सुनाऊँ हाल—ए—दिल , हमको तुम्हाराहि अासरा , तुम हमारे हो न हो* या गाण्यात.रफी या गाण्याच्या वेळी एक नवा गायक होता अाणि ललिताबाई टाॅपच्या गायिका.
याचं मानसिक दडपण रफीवर अालं होतं.त्यामुळे तो गाताना चुकंत होता व घाबरंत होता.ललिताबाईंच्या हे लक्षात अालं व त्यांनी रफीला धीर दिला.नंतर हे गाणं व्यवस्थित रेकाॅर्ड झालं. या उपकारांची जाण ठेऊन रफीने सुधीर फडके व ललिता देऊळकर यांच्या विवाहात *मराठी मंगलाष्टकं म्हटली !* { हि हकिगत बाबुजींचे चिरंजीव यांनाहि कदाचित् माहिती नसेल ! }

जाता जाता अाणखीन एक रोचक अाठवण सांगतो....
१९४७ च्या *जुगनू* पासून दिलीपकुमारसाठी रफी गायला लागला अाणि याच चित्रपटात रफी १९४५ *लैला मजनू* नंतर परंत एकदा  पडद्यावर दिसला होता!

मंडळी , रफीसाहेब हा एक मोठा अध्याय अाहे व तमाम जनतेला जे माहित अाहे , तेच परत लिहिण्याऐवजी जे माहित नाहि तेवढं रोचकतेने मांडण्याचा मी प्रयास केलाय.एरवी  ५६ वर्षांतील *रफी* १४ भागांत मांडणं हे एक शिवधनुष्यंच अाहे!

चला , अाता पुढच्या भागासह उद्या भेटू!
अापला विनम्र,
*उदय गंगाधर सरे*म—ठाणे

No comments:

Post a Comment